Pune Crime Nasrapur Rape case: पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका साडेतीन वर्षांच्या मुलीवर एका नराधमाने अत्याचार करुन तिला ठार (Murder news) मारल्याची घटना 1 मे रोजी घडली होती. या घटनेनंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते.
लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तात्काळ फाशी द्यावी, या मागणीसाठी पुण्यातील नवले पूलावर (Navale bridge Pune) नसरापूरच्या (Nasrapur Rape case) ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास आणि खटला फास्ट ट्रॅकवर चालवणार असल्याची ग्वाही दिली होती.
अशातच आता पीडित मुलीचा शवविच्छेदन अहवाल (Post Mortem report) समोर आला आहे. या अहवालातील माहिती अंगावर अक्षरश: काटा आणणारी आहे. यावरुन नराधमाने या मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिला किती निर्घृणपणे मारले होते, हे दिसून येत आहे. ही मुलगी आपल्या पालकांसह पुण्यात राहत होती.
ती उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आपल्या आजोळी नसरापूर येथे गेली होती. ती खेळत असताना आरोपीने तिला गोठ्यात वासरु दाखवायला नेतो सांगून आपल्यासोबत नेले होते आणि तिच्यावर अत्याचार केले होते. या प्रकरणातील आरोपी असलेल्या नराधमावर यापूर्वीही महिला लैंगिक अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल आहेत. (Pune Crime news)
नसरापूरमधील पिडीतेच्या शवविच्छेदन अहवालात अनेक हादरवणाऱ्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. या अहवालात नमूद केल्याप्रमाणे मुलीच्या तोंडात मोजा कोंबण्यात आला होता. लैंगिक अत्याचार करून तिचा खून करताना आरोपीने मुलीच्या तोंडात पाय मोजा कोंबल्याचे तसेच छातीवर वळ उमटले असल्याचे शवविच्छेदन करताना निदर्शनात आल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे या चिमुरडीची किती निर्घृणपणे हत्या करण्यात आली हे समजून येत आहे. ससून रुग्णालय प्रशासनाने शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना दिला आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर आणखी संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. अगोदर या प्रकरणावरुन राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा टीकेच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीची वैद्यकीय चाचणी देखील केली आहे. सध्या पोलिसांकडून सर्व पुराव्यांची जुळवाजुळ करण्याचे काम सुरु असून लवकरच आरोपपत्र दाखल होऊन या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरु होईल.




