Krushi Mitra Yojana : स्वत:च्या गावातच काम करा, १८,००० रु मानधन मिळवा, कृषीमंत्र्यांकडून नवीन योजनेची घोषणा, पात्रता काय ? माहिती आली समोर

Krushi Mitra Yojana:राज्यातील शेतकऱ्यांना अधिक प्रभावी मार्गदर्शन मिळावे आणि शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा, यासाठी राज्याच्या कृषी विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक गावात ‘कृषी मित्र’ नियुक्त करण्याची नवी योजना राबवण्यात येणार असून यामुळे तरुण शेतकऱ्यांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

पत्रकार परिषदेत योजनेची घोषणा

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दत्तात्रय भरणे यांनी या योजनेची सविस्तर माहिती दिली. राज्यातील शेतकऱ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन, तसेच सरकारी योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आधीच हजारो कृषी पर्यवेक्षकांची नियुक्ती

भरणे यांनी सांगितले की, राज्यात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ११,५८७ कृषी पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर ‘आत्मा’ योजनेअंतर्गत आता ‘कृषी मित्र’ किंवा ‘शेतकरी मित्र’ नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रत्येक गावात एक कृषी मित्र

राज्य सरकारने प्रत्येक गावात किमान एक कृषी मित्र नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या पदासाठी अनुभवी, प्रयोगशील आणि नवीन तंत्रज्ञान स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

कृषी अधिकाऱ्यांसोबत समन्वय

नियुक्त करण्यात येणारा कृषी मित्र हा संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांसोबत काम करणार आहे. यामुळे शेतकऱ्यांपर्यंत योजनांची माहिती आणि तांत्रिक सल्ला अधिक जलद आणि प्रभावीपणे पोहोचवता येणार आहे.

मानधनाची तरतूद

या योजनेअंतर्गत कृषी मित्रांना वर्षाला १८,००० रुपये मानधन देण्यात येणार आहे. हे मानधन दर तीन महिन्यांनी वितरित केले जाईल. ही योजना १ जूनपासून सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे.

पात्रतेच्या अटी आणि महिलांना प्राधान्य

कृषी मित्र पदासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. उमेदवाराचे वय ४० वर्षांपेक्षा कमी असावे, संवाद कौशल्य चांगले असावे आणि समाजकार्याची आवड असावी. तसेच सोशल मीडियाचा वापर करता येणे आवश्यक आहे. किमान माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, या योजनेत ३० टक्के महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे.

Leave a Comment