HSC Passing Certificate Distribution : २ मे रोजी बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर, गुणपत्रिकेच्या मूळ प्रतींअभावी रखडलेल्या पुढील प्रवेश प्रक्रियेला आता गती मिळणार आहे. राज्य मंडळाने सर्व ९ विभागीय मंडळांना कागदपत्रे सुपूर्द केली आहेत. बारावी परीक्षेचे मूळ गुणपत्रक आणि प्रमाणपत्र येत्या सोमवारी, २५ मे २०२६ रोजी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अधिकृतपणे वितरित केले जाणार आहे.
राज्य मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता बारावी परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना येत्या सोमवारी (२५ मे) प्रदान करण्यात येणार आहे. राज्य मंडळाने याबाबत सर्व विभागीय मंडळे; तसेच ज्युनिअर कॉलेजांना सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागीय मंडळांतर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल दोन मे रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात आला होता. यानंतर आता गुणपत्रक, प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र आणि तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप संबंधित विभागीय मंडळांमार्फत करण्यात येणार आहे.
सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना हे साहित्य २५ मे रोजी सकाळी ११ वाजता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित उच्च माध्यमिक शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांकडून त्याच दिवशी दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रक आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. विभागीय मंडळांनी सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित केले असून, प्राचार्य, विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी केले आहे.




